5 अश्या व्यक्ती ज्यांच्यामुळे आधुनिक कंप्युटिंग शक्य झाले

आज, आपण गृहपाठ करण्यापासून ते मित्रांच्या संपर्कात रहाण्यापर्यंत जवळपास सर्वच गोष्टींसाठी कंप्युटरचा वापर करतो. परंतु तुम्ही जर भूतकाळात डोकावून 50 वर्षे मागे गेलात तर तुम्हाला असे आढळून येईल की पूर्वी असे नव्हते. जगाच्या इतिहासातील तुलनेने नविन असलेल्या या शोधाच्या मागे अनेक वर्षांचे खडतर कष्ट, अभ्यास, संशोधन आणि एक असे यंत्र जे अशक्याला शक्य करून दाखवेल ते बनविण्याचे स्वप्न होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज आपण ज्याला संगणक किंवा कंप्युटर म्हणून ओळखतो त्याचा जन्म झाला.

 

1. अल ख्वारिझमी, संगणक विज्ञानाचे आजोबा.

मोहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिझमी हे एक पर्शियन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, भूगोलिय ज्योतिषी आणि बगदाद मधल्या हाऊस ऑफ विस्डम मधील विद्वान होते. अल ख्वारिझमी यांनी गणितातील अल्गोरिदम ही संकल्पना विकसित केली याच कारणामुळे त्यांना संगणक विज्ञानाचे आजोबा असे म्हटले जाते.

आज आपण अल्गोरिदम या सूचनांच्या अनुक्रमाच्या आधारे सॉफ्टवेयर प्रोग्राम करतो. जर अल्गोरिदम नसते तर आधुनिक कंप्युटर्स अस्तित्वात आलेच नसते. कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्याच्या गुगलच्या क्षमते पासून ते कंप्युटर "शट डाऊन" करण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत कंप्युटरशी संबंधित सर्वच गोष्टी अल ख्वारिझमींच्या 1200 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या सिद्धांतांवर आधारित असतात. हे खरोखरच आश्चर्यजनक आहे नाही का?

 

2. चार्ल्स बॅबेज, पहिल्या कंप्युटरचा निर्माता

सन 1791 मध्ये लंडनमधील एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेला चार्ल्स बॅबेज हा जनरल प्रोग्रॅमेबल कंप्युटरच्या कल्पनेचा जनक होता. त्याने दोन वेगवेगळे कंप्युटर्स बनविण्याच्या योजनांचे आराखडे बनविण्यात आपले आयुष्य खर्च केले. पहिला, ज्याला डिफरन्स इंजिन असे संबोधले गेले तो 1830 च्या सुरूवातीच्या काळात जवळपास पूर्ण होत आला होता. परंतु ॲनॅलिटिकल इंजिन हा त्याचा दूसरा आणि थोडा जास्त जटील असलेला आराखडा मात्र कधीच पूर्ण झाला नाही. असे असले तरी, त्याचे दोन्ही आराखडे हे त्या कालखंडात उपलब्ध असलेल्या साधनांपेक्षा खूप जास्त प्रगत अशी गणन साधने म्हणून प्रसिद्ध झाले.

त्याची यंत्रे ही मूलतः इतिहासातील पहिले कंप्युटर्स ठरली.

 

3. ॲलन ट्युरिंग, आधुनिक कंप्युटरचा जनक

ॲलन ट्युरिंग हा दूस-या महायुद्धातील नायक ठरला होता कारण, त्याने ब्लेचली पार्क येथे त्याच्या सहका-यांच्या सोबतीने, नाझी एनिग्मा यंत्राद्वारे कूटबद्ध केलेले गोपनीय संदेश डीकोड करणारे बॉम्बे नावाचे यंत्र बनविले होते. असे म्हटले जाते की, ॲलन ट्युरिंग जर नसता तर, पुढील आणखी 8 वर्षे युद्ध चालूच राहिले असते.

ॲलन ट्युरिंगच्या इतर अनेक योगदानांसोबतच त्याने कंप्युटर प्रोग्रॅमिंगचा मार्ग दाखवून दिला. सुरूवातीचे कंप्युटर्स त्यांच्या मेमरी मध्ये प्रोग्रॅम्स साठवून ठेवत नसत. या कंप्युटर्सना एखादे नविन कार्य करावयास द्यायचे असेल तर प्रत्येक वेळी मशीनची थोडी वायरिंग सुधारणे, हाताने केबल्सची जागा बदलणे आणि स्विचेस सेट करणे इत्यादी गोष्टी कराव्या लागत. जवळपास 7 दशकांपूर्वी ॲलन ट्युरिंगने असा पहिला कंप्युटर बनविला जो प्रोग्रॅम्स साठवून ठेवू शकत होता. आपल्याला माहित असलेल्या कंप्युटर्सच्या जगातील हे अत्यंत अमूल्य असे योगदान होते.

 

4. डग्लस एंगेलबार्ट - माऊस च्या शोधाचा जनक

माऊस शिवाय कंप्युटर वापरणे किती कठीण झाले असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? श्री. एंगेलबार्ट यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत की आपल्याला अशी कल्पना करण्याचीसुद्धा गरज नाही. माऊसच्या मदतीने आपण कंप्युटर अगदी सहजतेने वापरू शकतो. माऊसचा शोध लागण्यापूर्वी कंप्युटरला  सर्व कमांड्स की-बोर्डच्या सहाय्यानेच द्याव्या लागत होत्या. परंतु आता मात्र तुम्ही केवळ तुमच्या माऊसला मार्गदर्शन करून क्लिक करू शकता.

 

5. टीम बर्नर्ज ली - यांनी केवळ दोन दशकांपूर्वी वल्ड वाइड वेब ची निर्मिती केली.

25 वर्षांपूर्वी WWW नव्हते. विविध कंप्युटर्स मध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी इंटरनेटचा विकास 1960 मध्ये केला गेला. परंतु लोकांना वापरण्यासाठी ते अधिक सुलभ करण्याचा निर्णय टीम बर्नर्ज ली यांनी घेतला आणि वल्ड वाइड वेब चा शोध लावून त्यांनी ते कार्य सिद्धीस नेले.

एका मुलाखतीमध्ये हा ब्रिटिश संगणक वैज्ञानिक म्हणतो की, वेब मध्ये अंतर्भूत असलेले सारे तंत्रज्ञान हे आधीपासूनच विकसित झालेले होते आणि त्यांनी केवळ त्या सर्व तंत्रज्ञानाचे एकत्रित संकलन केले! किती ही विनम्रता!

 

आपल्याला माहित असलेल्या कंप्युटरला आजचे आधुनिक स्वरूप देण्यामध्ये अनेक वैज्ञानिक आणि कंप्युटर इंजिनियर्सचा सहभाग जरी असला, तरी वर उल्लेखिलेल्या पाच व्यक्ती अश्या आहेत ज्यांच्या द्रष्टेपणा आणि कठोर परिश्रमांमुळे आधुनिक कंप्युटिंग शक्य झाले आहे.