तुमच्या मुलांना शिकण्यासाठी उपयोगी होतील असे तीन परिणामकारक मार्ग

 

प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. काही मुले एखादा विषय आवडतो म्हणून भरपूर कष्ट घेऊन त्याचा अभ्यास करतात, तर काही मुले नाइलाजाने त्या विषयाचा अभ्यास करतात. एक पालक म्हणून तुमची इच्छा असते की मुलांनी कष्ट घेऊन मनापासून अभ्यास करावा आणि त्याचा त्यांना पुढील आयुष्यात उपयोग व्हावा.

परीक्षेचा तणाव मुलांना कायमच जाणवत असतो. पुढे दिलेल्या काही खात्रीशीर उपायांचा अवलंब करून तुमच्या मुलांना आत्मविश्वासाने परीक्षा देण्यासाठी तयार करा.

1. सराव तपासणी

हा अभ्यास करण्याचा सर्वात सामान्य आणि महत्वाचा मार्ग आहे. याने तुमच्या मुलांना खूप मदत मिळते. प्रश्नपत्रिका सतत सोडवत राहिल्याने अभ्यासाची उजळणी तर होतच राहते पण त्याचबरोबर तुमच्या मुलांना प्रत्येक वेळी जास्त चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देखिल मिळते. तसेच कोणत्या पाठांची जास्त उजळणी करण्याची गरज आहे ते देखिल तुमच्या मुलांना समजते.

गूगल फॉर्म्स चा वापर करून शिक्षक मुलांसाठी प्रश्नमंजुषा तयार करू शकतात किंवा विद्यार्थी स्वतःच त्यांच्या विषयांशी संबंधित वेबसाइट्स वरून सराव प्रश्नपत्रिका तयार करू शकतात.

2. वितरीत सराव

एकाच वेळी बसून संपूर्ण विषयाचा भरपूर अभ्यास करण्यापेक्षा, थोडा वेळ अभ्यास करून मध्ये थोडासा वेळ थांबणे आणि इतर काहीतरी करून मेंदूला ताजेतवाने करणे अत्यंत फायदेशीर असते. असे केल्याने वाचलेली माहिती समजून घेण्यास मेंदूला वेळ मिळतो. उदाहरणार्थ - भूगोलाचा अभ्यास करताना मध्ये मध्ये थांबून अभ्यासाशी संबंधित इतर उपक्रम केल्याने तुमची मुले आनंदाने अभ्यास करतील. करत असलेल्या अभ्यासाशी संबंधित नसलेले टेड टॉक्स किंवा शैक्षणिक स्पॉर्कल गेम्स यांच्या सहाय्याने अभ्यासातील खंड आनंददायी होऊ शकतो.

वेळापत्रक तयार करणे महत्वाचे असते. त्यात 15 मिनिटांचा का होईना पण थोडा मोकळा वेळ सुद्धा समाविष्ट करावा.

3. विस्तारीत चौकशी

प्रत्येक सिद्धांतामागचे कारण म्हणजेच "असे का" हे शोधून काढण्याच्या प्रक्रियेला इलॅबोरेटिव इंटरोगेशन (विस्तारीत चौकशी) असे म्हणतात. सुरूवातीला कोणत्याही विषयाची सखोल माहिती मिळविण्याच्या कामात पीसीचा वापर करून गूगल स्कॉलर सारख्या गोष्टींची मदत घेता येईल. कोणत्याही गोष्टीत "असे का" हे शोधून काढल्यावर तुमच्या पाल्याला वर्गात शिकविल्या गेलेल्या गोष्टींचा दैनंदिन व्यवहारातील गोष्टींशी संबंध जोडता येईल.

या पद्धतीचा वापर केल्यास मुलांना त्याच्या वेगाने शिकता तर येतेच, शिवाय संकल्पना नीट समजल्यामुळे केलेला अभ्यास जास्त काळ लक्षात राहतो.

तुमच्या पाल्याला अभ्यास करण्यासाठी घोकंपट्टी व्यतिरिक्त इतरही पर्याय आहेत हे लक्षात असू द्या. पीसी आणि तुमचा पाठिंबा हे उपलब्ध असल्यास तुमची मुले चांगला अभ्यास करू शकतील.