वर्गात सादरीकरण करण्यापूर्वी तुमच्या कौशल्यांना उजाळा देण्याचे पाच मार्ग

 

 

कोणत्याही शिक्षकाला विचाराल तर, वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे आणि आपण शिकवत असलेल्या गोष्टींत त्यांना रमवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे ते मान्य करतील. एखाद्या उत्कृष्ट व्याख्यानाच्या वेळी नेमके बहुसंख्य मुलांचे लक्ष नसते. पण निराश व्हायची गरज नाही.

अशा गोष्टींसाठी आपले पीसी हे सर्वोत्कृष्ट साधन ठरतात.

यासाठी एमएस पॉवरपॉइंट चा वापर करा

याचा योग्य प्रकारे वापर केला तर कोणताही धडा मनोरंजक उपक्रम बनू शकतो. यात तुमच्या वापरासाठी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध असतात. पण त्यासाठी सादरीकरण कौशल्यांची गरज भासते.

तुमच्या सादरीकरणाला चांगल्यापासून उत्तम स्तरावर नेण्यासाठी पुढील पाच मार्गांचा वापर करा :

1. नीट लक्षात राहण्यासाठी दृश्यमान साधनांचा वापर करा

शब्दसंख्या शक्य तितकी कमी ठेवावी. तुमच्या सादरीकरणात दृश्यमान गोष्टी जितक्या जास्त असतील, तितके तुमचे विद्यार्थी संकल्पना पटकन समजून घेऊन जास्त काळ लक्षात ठेवतील. या दृश्यमान गोष्टींमध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव केला जाऊ शकतो - आकृत्या, फ्लो-चार्ट्स आणि आलेख. तितकेच नाही तर, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी व्हिडिओज् चा वापर देखिल तुम्ही करू शकता.

2. वारंवार बदल करा

विद्यार्थ्यांची एकाग्रता फार वेळ टिकून रहात नाही हे तर तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे दर 15-20 मिनिटांनी तुमची शिकविण्याची पद्धत बदला. उदाहरणार्थ - तुमच्या सादरीकरणाच्या दरम्यान विद्यार्थी नीट लक्ष देत आहेत याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही मध्ये मध्ये प्रश्न विचारू शकता किंवा एखादा सामूहिक उपक्रम करायला लावू शकता.

3. विनोदाची भर घाला

भावनिक प्रतिसादामुळे लक्षात राहण्यास मदत मिळते. तुमच्या सादरीकरणात थोड्या विनोदाचा अंतर्भाव केलात तर विद्यार्थी ती संकल्पना जास्त काळ लक्षात ठेवू शकतील तसेच त्या विषयावर वर्गात चर्चा देखिल केली जाईल. परंतु विनोद थोड्या प्रमाणात आणि विषयाला अनुसरूनच असतील याची दक्षता घ्यावी.

4. रंगांचे आकर्षण सर्वांनाच असते

एखाद्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घ्यायला, परीक्षेत येऊ शकणा-या एखाद्या गोष्टीवर भर द्यायला, महत्वाची माहिती लक्षात ठेवण्यास मदत करायला किंवा माहिती क्रमवार मांडायला अश्या कोणत्याही गोष्टींसाठी रंगांचा वापर केला तर ते जास्त चित्तवेधक ठरते. परंतु अती प्रमाणात रंगांचा वापर केला तर ते विचित्र दिसून त्यातील मजा निघून जाते. त्यामुळे मर्यादित वापर करा.

5. सारांश सांगा

शिकवलेल्या मुद्द्यांचा सारांश सांगण्यासाठी शिकविताना मध्ये मध्ये विराम घ्या. काही वेळेस विद्यार्थ्यांना शिकविलेल्या गोष्टींचा सारांश विचारा. तसे केल्याने माहिती नीट लक्षात राहून परीक्षेच्या वेळे आठवण्याची शक्यता वाढते.

तुमचे सादरीकरण प्रभावशाली बनविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, त्यात वर्च्युअल फिल्ड ट्रिप्स चा अंतर्भाव करणे. त्यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना वर्गात बसून जगाची सफर केल्याचा अनुभव मिळू शकतो.