पीसी च्या मदतीने अभ्यास करण्यासाठी तुमच्या मुलांना कसे प्रोत्साहन द्यावे

 

परीक्षा एका महिन्यावर आली आहे. परीक्षेचे वेळापत्रक देखिल मिळाले आहे आणि तुम्ही मात्र तुमच्या पाल्याला अभ्यासासाठी एका जागी कसे बसवता येईल या विवंचनेत आहात. अभ्यासात मदत करण्यासाठी पीसी तर उपलब्ध आहे, पण तो पीसी अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देखिल देऊ शकेल का?

1. एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करावा ते निवडणे

मुलांना जेव्हा अभ्यास कसा करावा हे निवडण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्यात अभ्यास करण्यात उत्साह निर्माण होतो. [1] नियंत्रणाची ही भावना, मुलांना त्यांच्या त्यांच्या गतीने अभ्यास करण्यास शिकवते आणि मग मुले स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःच घेतात. पीसी च्या मदतीने विविध व्हिडिओज्, खेळ, संवादात्मक प्रश्नमंजुषा, माइंड मॅपिंग हे सर्व तुमच्या मुलांच्या आवाक्यात येते.

2. त्यांची तयारी कुठपर्यंत झाली आहे हे त्यांना कळू द्या

आपण चांगली प्रगती करत आहोत, हे समजण्याने जे प्रोत्साहन मिळते, ते इतर कशातूनही मिळत नाही. सराव पत्रिका सोडविणे, वर्कशीट्स भरणे, प्रश्नमंजुषांची उत्तरे देणे, ऑनलाइन चाचण्या देणे या सर्व गोष्टींमधून तुमच्या मुलांना त्यांची किती तयारी झाली आहे ते समजते. यामुळे प्रत्यक्ष परीक्षेसाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. त्याचबरोबर अभ्यासात जर काही उणीवा राहिल्या असतील, तर त्यादेखिल त्यांना भरून काढता येतात. [2]

3. पीसी ब्रेक घ्या!

अभ्यासक्रम जरी कितीही जास्त असला, तरी तुमच्या पाल्याची एकाग्रता वाढविण्यासाठी अधून मधून विश्रांती घेणे आवश्यक असते. मनोरंजक तसेच ज्ञानदायक असे खेळ निवडून तुम्ही हा विश्रांतीचा वेळ सार्थकी लावू शकता. अभ्यासाच्या वेळापत्रकात याचा असा रीतीने समावेश करा की त्यातून अभ्यास, खेळ आणि मनोरंजन यांसाठी लागणा-या वेळाचा समतोल राखला जाईल. [3]

4. त्यांच्या स्वप्नातील डेस्क (मेज)

तुमच्या मुलांना त्यांचे डेस्क कसे पाहिजे आहे ते विचारून त्याप्रमाणे त्याची रचना करा. त्यांचे आवडते खेळणे, सुपरहीरोच्या प्रतिकृती, पोस्टर्स किंवा पीसी वर त्यांच्या आवडीचा स्क्रीनसेवर अशा काही साध्या गोष्टी केल्याने त्यांचे अभ्यासाचे डेस्क त्यांना आपलेसे वाटू लागते आणि त्याने खूप चांगला परिणाम होतो. तुमच्या पाल्याच्या डेस्कवरील अडगळ टाळण्यासाठी तुम्ही AIO (ऑल इन वन) पीसी चा पर्याय देखिल निवडू शकता.

सर्वात महत्वाचे म्हणजे, अभ्यासात पुढे जाण्यासाठी अभ्यासाला सुरूवात करणे महत्वाचे असते. आपल्या पाल्याला कशाने प्रोत्साहन मिळेल हे फक्त पालकांनाच माहित असते. काही उदाहरणे म्हणजे, परीक्षेत पूर्ण गुण, वर्गात पहिला क्रमांक, मोठे झाल्यावर त्यांना काय बनायचे आहे, एखाद्या विषयाची मनापासून आवड, अभ्यासक्रमाबाहेरील काही उपक्रम इत्यादी.

तुमच्या पाल्याच्या यशासाठी पीसी ला प्रोत्साहनाचे साधन बनू द्या.