शाळेत नवकल्पना दिनाचे आयोजन कसे करावे

 

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर इनोवेशन (नवकल्पना) म्हणजे, मोठी कल्पना वापरून समस्या सोडवणे. इनोवेशन हे वर्ग, उपहारगृह आणि शाळेतील क्रीडांगणावर ओल्या आणि सुक्या कच-यासाठी वेगवेगळे डब्बे करण्याइतके लहान असू शकते किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी दररोज आपला स्वतःचा पीसी शाळेत घेऊन येण्याइतके परिवर्तनीय देखिल असू शकते!

16 फेब्रुवारी हा नवकल्पना दिवस, प्रत्येक काम करण्याचे नविन, चांगले मार्ग शोधून काढण्याचा दिवस म्हणून साजरा करता येईल. मग आज तुम्ही कशा प्रकारे इनोवेटिव बनणार आहात? पुढे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय आणि ज्ञानदायक बनविण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते?

पायरी 1 - समस्या ओळखणे

फर्स्ट थिंग्ज फर्स्ट असे म्हणतात म्हणजे महत्वाच्या गोष्टी आधी कराव्यात. चला तर मग, तुमच्या शाळेतील सोडविता येण्यासारखी आणि अद्वितीय अशी समस्या सर्वप्रथम शोधून काढूया. हे करताना, तुमच्या विद्यार्थ्यांचे वय आणि त्यांना उपलब्ध असलेली सामग्री यांचा विचार करायला विसरू नका. तुमची इच्छा असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतः समस्या शोधायला सांगू शकता.

पायरी 2 - टीम (संघ) बनवा

तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कौशल्ये निर्माण करण्यासाठी आणि त्यांना परिणामकारक रीतीने एकमेकांशी सहयोग करणे शिकवण्यासाठी, ऑनलाइन टीम जनरेटर Keamk [1] चा वापर करून वेगवेगळी कौशल्ये अवगत असणा-या आणि एकमेकांना न ओळखणा-या विद्यार्थ्यांचे संघ बनवा.

पायरी 3 - योग्य साधने पुरवा

तुम्ही किंवा तुमच्या विद्यार्थ्यांनी जी समस्या निवडली आहे, तिच्यावरील उपाय शोधून काढण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक संघाला एक पीसी, वायफाय वापरण्याची परवानगी, आवश्यक ते लेखनसाहित्य आणि एक अख्खी दुपार द्या. विद्यार्थांना जर काही प्रश्न पडले, तर त्यांची उत्तरे तुम्ही द्या परंतु समस्येवरील उपाय मात्र त्यांना स्वतःलाच शोधू द्या. तसे करण्याने त्यांची समस्या सोडविण्याची क्षमता अधिक प्रगत होईल.

पायरी 4 - सादरीकरण नेहमीपेक्षा अधिक रंजक बनवा

सादरीकरणाची वेळ दिवस संपताना ठेवा. यावेळी समारंभाचे वातावरण निर्माण करा आणि त्यात विद्यार्थ्यांनी कष्टपूर्वक केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार माना. असे केल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे कौतुक केल्याचे समाधान मिळेल तसेच त्यांना हुरूप देखिल येईल. या आभार प्रदर्शनात शाळा सुटल्यावर कंप्युटर लॅब मध्ये तासभर खेळणे किंवा एखादी मोफत फील्ड ट्रिप अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश करता येईल.

शिक्षण आणि नवकल्पना हे एकमेकांना पूरक आहेत. शाळेतील नेहमीच्या दिवसापेक्षा काहीतरी वेगळा आणि मनोरंजक असा दिवस घालवायला मिळाल्याने विद्यार्थी आनंदी तर होतीलच पण त्याच बरोबर, त्यांना अशा गोष्टींमध्ये आवड निर्माण होईल आणि त्याचा फायदा त्यांना भविष्यातील कारकीर्दीसाठी होईल.

पीएस (पुनश्च) - जर संपूर्ण दिवस या कामासाठी देणे कठीण होत असेल, तर दिवसाचा शेवटचा तास नवकल्पना तास म्हणून वापरता येऊ शकतो.