शिक्षणासाठी कॉम्प्युटर (पीसी) – नव्याने शिक्षक झालेल्या व्यक्तींसाठी आवश्यक

 

सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे, तुमचं अभिनंदन! शिक्षक म्हणून तुमची ही पहिलीच नोकरी आहे. याआधी तुम्ही कदाचित शिक्षक साहाय्यक म्हणून काम पाहिलं असेल, बदली शिक्षक किंवा एखाद्या वरिष्ठाच्या हाताखाली काम केले असेल. शिक्षणाच्या बाबतीत, स्टेशनरी म्हणजे अभ्यास-साहित्यातील कागद वगैरे, क्रमिक पुस्तके आणि अभ्यासक्रमाचे साहित्य यांच्याव्यतिरिक्त पीसी म्हणजेच कॉम्प्युटरचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. ह्याची कारणे बघा:

१. पाठ-नियोजनाचे (लेसन-प्लॅनिंग) समर्थक होण्यासाठी

योग्य कालावधी हातात ठेवून केलेले पाठ-नियोजन आणि वर्गात कोणत्याही शंकांना सामोरे जाण्यासाठी केलेली पूर्वतयारी एका चांगल्या शिक्षकाला उत्कृष्टतेकडे नेते. जेव्हा तुमच्याकडे एक निश्चित नियोजन (प्लॅन) असते, तेव्हा तुमच्या प्रगतीचा आलेख तपासणे आणि संबंधित साधने (रिसोर्सेस) तयार ठेवणे खूपच सोपे जाते. एज्युकेशन वर्ल्ड आणि टीचर ह्या दोन वेबसाईट्स पाठ नियोजनासाठी टेम्प्लेट्स आणि नवीन युक्त्या (आयडिया) मिळवणे या दोन्हीही दृष्टींनी खूपच उपयुक्त स्रोत (सोर्स) आहेत.

२. वर्गाला बोलते करण्यासाठी युक्तीचा एकच धागा पुरेसा आहे.

वर्गात फक्त शिक्षकांनी एकट्यानेच बोलण्याचा आणि मुलांनी निमूटपणे ऐकण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. तुमचे विद्यार्थी उत्साही आणि चिकित्सक असतील, तर ते नक्कीच तुमचं सगळं म्हणणं लक्ष देऊन ऐकत आहेत, ह्याची खात्रीच बाळगा- पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा वर्गात दोन्ही बाजूनी संवाद होईल. म्हणूनच पाठ शिकवताना युक्तीने त्यातला असा एक धागा पकडा की मुले संवाद साधायला प्रवृत्त होतील आणि प्रत्येकवेळी मुले त्या क्षणाची वाट पाहतील.

३. मुलांना हवाहवासा वाटेल असा गृहपाठ (होम-वर्क) दया.

प्रकल्प/प्रोजेक्ट्स, समूह कृती/ग्रुप असाईनमेंट्स, विज्ञान/सायन्सचे प्रयोग आणि क्षेत्रभेट/फिल्ड ट्रीप या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे?
ह्या सगळ्या प्रत्यक्ष कृतीद्वारे करण्याच्या गृहपाठाच्या युक्त्या आहेत. आणि यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुले ह्या सगळ्या गोष्टी फारच उत्साहाने करतात आणि त्यामुळे त्यांना तो अभ्यास विषय चांगल्या रीतीने समजायला सुद्धा मदत होते.

४. तुमच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घ्या.

परीक्षा म्हंटलं की पेपर, पेन, पॅड, कंपासपेटी असा सगळा जामानिमा डोळ्यासमोर येतो. पण ह्या अशा पद्धतीचे फायदेही आहेत आणि ही पद्धती पुढेही चालू राहणारच. मात्र ह्या परीक्षा पद्धतीला पीसीच्या मदतीने गुगल क्लासरूम सारख्या साधनांचा उपयोग करून आपण एक वेगळे रूप देऊ शकतो. नेहमीच्या परिक्षेच्या तुलनेतच सांगायचं झालं तर, तुम्ही मुलाना त्वरित तुमची प्रतिक्रिया (फीडबॅक) देऊ शकता, त्याबरोबरच अभ्यासासाठी अधिक साधनांची (रिसोर्सेस) माहिती देऊ शकता आणि याच्या निमित्ताने तुम्ही नेहमीपेक्षा अधिक वेळा परीक्षा घेऊ शकता.

५. नवीन अद्ययावत अध्यापन पद्धतींबाबत (टीचिंग ट्रेंड्स) जागरूक राहा.

जुना आणि नवीन शिक्षकांना सुद्धा एकमेकांशी नवनवीन कल्पना सांगायच्या असतील, काही सल्ला घ्यायचा असेल, मदत हवी असेल, तर त्यांचा मदतीसाठी टीचर्स ऑफ इंडिया, एड्युटोपिया कम्युनिटी आणि मायक्रोसॉफ्ट एड्युकेटर कम्युनिटी ह्या कम्युनिटी (ग्रुप्स) एक क्लिकच्या अंतरावर आहेत. एवढंच नाही, तर दिवसातली फक्त काही मिनिटे जर तुम्ही इथे दिलेल्या माहितीचे वाचन केलंत तरीदेखील शिक्षणक्षेत्रात चाललेल्या घडामोडी तुम्हाला समजू शकतील.

जे शिक्षक / शिक्षिका विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाशी जवळीक निर्माण करण्याचा किंवा अभ्यासाची गोडी लावण्याचा ज्या खुबीने प्रयत्न करतात किंवा कष्ट घेतात, त्यावरूनच एखादे चांगले शिक्षक आणि उत्कृष्ट शिक्षक असा फरक करता येतो. तुम्ही आत्ता वापरत असलेल्या पीसीचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही सुद्धा हा बदल तुमच्यात घडवून आणू शकता.