शिक्षणासाठी कॉम्प्युटर: तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवशास्त्र (बायोलॉजी) अधिक चांगले शिकवा

 

बायोलॉजी किंवा जीवशास्त्र, हा विज्ञानाच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यात अनेक प्रकारचे उपविषयदेखील आहेत. जसे - जेनेटिक्स (अनुवंशिकताशास्त्र), इकॉलॉजी (पर्यावरणशास्त्र) आणि हेल्थ (आरोग्य). कोणत्याही विद्यार्थ्याला फायदा होऊ शकेल, अशी क्षमता या विषयात आहे. याशिवाय या विषयाचा अभ्यास, औषधनिर्माण शास्त्र (मेडिसिन), वैज्ञानिक संशोधन, पोषण आणि आरोग्य (न्युट्रीशन आणि फिटनेस) या सर्व क्षेत्रांमधील करियरसाठी पायाभूत ठरतो. मात्र ह्या विषयाच्या अभ्यासाने एवढ्या प्रकारचे फायदे असूनही, केवळ त्यातील रूक्ष अभ्यास घटक आणि विषय शिकवण्याची तीच व्याख्यानात्मक जुनी पद्धत यामुळे मुले या विषयात फार उत्साहाने रस घेत नाहीत.

एक शिक्षक म्हणून, मुलांचा अभ्यासातील उत्साही सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही खूप कांही करू शकताइथे काही टूल्स आणि डिजिटल रिसोर्सेस दिलेली आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मुलांचे लक्ष तुमच्या शिकवण्याकडे केंद्रित करू शकता आणि त्यांना विविध गोष्टींमध्ये गर्क ठेवू शकता. [1]

 

1. इंटरॅक्टिव्ह बायोलॉजी (परस्पर-सहभागी जीवशास्त्र)

इंटरॅक्टिव्ह बायोलॉजी ही इतर अध्यापन स्रोतांपेक्षा (टीचिंग रिसोर्सेस) निराळी आहे. वेबसाईटवर उपलब्ध असणारे व्हिडिओ मुलांना खिळवून तर ठेवतातच, शिवाय वर्गात शिकलेल्या गोष्टी त्यांना दृश्यस्वरूपात पाहता येतात. प्रत्येक व्हिडिओ हा एक संक्षिप्त स्वरूपाचा धडाच असतो, ज्यामध्ये संबंधित अभ्यास-घटक वाचण्यासाठी लिंक्स दिलेल्या असतात. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे- हा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे लेजली सॅम्युएल यांनी स्वत: वर्गात शिकवलेले धडे आहेत. लेजली सॅम्युएल हे जीवशास्त्र क्षेत्रातील एक नामांकित संशोधक आहेत.

 

2. सेरेनडिप स्टुडिओ

गेम्स हे एकाचवेळी आपल्या ज्ञानाची परीक्षाही घेतात आणि धमालही आणतात. या गेम्समुळे वर्गात जे चुरशीचे वातावरण निर्माण होते, त्यामुळे मुलांचा उत्साह आणखी वाढतो. सेरेनडिप स्टुडिओमध्ये शिकवलेल्या प्रत्येक धड्यावर आधारित एक गेम असतो. त्या गेमद्वारे मुले वर्गात शिकवलेल्या गोष्टी तपासून पाहू शकतात आणि तेही आनंदाने, एरव्ही त्रास देणारा परीक्षेचा बागुलबुवा गेम खेळताना जवळ फिरकतही नाही. याशिवाय अध्यापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी या वेबसाईटवर काही माहितीपर सूचना (इंस्ट्रक्शनल सजेशन्स) असतात आणि पूर्वतयारीसाठी तसेच पाठपुरावा करण्यासाठी काही अॅक्टिव्हिटी (उपक्रम) दिलेल्या असतात.

 

3. बायोलॉजी कॉर्नर

वर्गातला एखादा छोटासा समूह उपक्रम (ग्रूप अॅक्टिव्हिटी) असो, एखाद्या क्लिष्ट संकल्पनेवर दिलेली छोटीशी टेस्ट असो किंवा गृहपाठ असो, जीवशास्त्र या विषयाला मुलांना खिळवून ठेवण्यासाठी शिक्षकांना सातत्याने वर्कशीट्सची गरज लागते. बायोलॉजी कॉर्नर हा वर्कशीट्स उपलब्ध करून देणारा असाच एक स्रोत आहे. इथे शरीरशास्त्रापासून (अॅनाटॉमी) पर्यावरणशास्त्रापर्यंत (इकॉलॉजी) कोणत्याही विषयावरील वर्कशीट्स उपलब्ध होतात. याशिवाय या वेबसाईटवर "हॅन्डी सायन्स मेथड्स" असा एक विभाग आहे त्यामध्ये पाठ - नियोजनाबरोबरच (लेसन प्लान) प्रयोगविषयक क्रमवार सूचना दिलेल्या असतात.

अशा सक्षम शिक्षकांमुळे वर्गात खरोखर चैतन्य निर्माण होत असते. वर्गातला अशा प्रकारचा उत्साह आणि माहिती यांचा जेव्हा योग्य समन्वय साधला जातो, तेव्हा मुलांना देखील, आपण ही माहिती नुसती "ऐकत" नसून ती "ग्रहण" करतो आहोत आणि अध्ययन प्रक्रियेत सक्रीय सहभागी आहोत, या गोष्टीचा आनंद घेता येतो.

बघा हं! बायोलॉजी हा तुमच्या विद्यार्थ्यांचा अगदी आवडता विषय होऊ शकतो.